संस्थेविषयी

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाड-पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे तेरा चौदा वर्षापूर्वी दर्जेदार शिक्षण देणार्‍या संस्था अत्यंत कमी प्रमाणात कार्यरत होत्या. नेमकी हीच कमतरता दूर करण्यासाठी विद्याधनं सर्वधनप्रधानम या बोधवाक्यातून प्रेरणा घेऊन दि. १ मे १९९३ या महाराष्ट्र दिनी शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना महाड येथे करण्यात आली त्यानंतर गेली सुमारे एक तपाहून अधिक काळ महाड पोलादपूर तालुक्यातील शैक्षणिकदृष्ट्या वंचित असणार्‍या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगोत्री नेण्यासाठी संस्था कार्यरत आहे.

आपल्या शैक्षणिक कार्याचे नियोजन करताना संस्थेने सुरुवातीपासून एक विकासात्मक दृष्टिकोन स्वीकारुन दृर्गम व डोंगराळ भागातील आदिवासीं पासून ते पोलादपूर सारख्या निमशहरी व महाड सारख्या शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचा अभ्यास करुन एक दिशा निश्चित केली. या नियोजनाला अनुसरुन प्रारंभिच्या काळात संस्थेने महाड तालुक्यात विविध ठिकाणी अंगणवाड्या, बालवाड्या सुरु केल्या अर्थात केवळ संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक विकासाला प्राधान्य देण्याची संस्थेची भूमिला असल्यामुळे दर्जेदार शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. संस्थेचे शैक्षणिक कार्य खालील शाळा, महाविद्यालयांद्वारे अव्याहतपणे सुरु आहे.

 
अ.न. शाळा महाविद्यालयाचे नाव स्थापना
शिवभूमी माध्यमिक विद्यालय दाभोळ, ता. महाड जून १९९४
सुंदरराव मोरे महाविद्यालय, पोलादपूर सप्टेंबर १९९८
प्राथमिक अदिवासी आश्रमशाळा मुमूर्शी, ता. महाड फेब्रुवारी १९९९
आदर्श विद्यालय, महाड सप्टेंबर १९९९
संस्कार भारती इंग्लिश मिडीयम स्कूल, महाड जून २००२
शिवाई इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी सेंटर, महाड जुलै २०१०
शिवाई इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी सेंटर, पोलादपूर जुलै २०१०
 
वरील सर्व उपक्रमांद्वारे तसेच आगामी काळात परिसरातील शैक्षणिक गरजांचा अभ्यास करुन नवीन शैक्षणिक उपक्रमांद्वारे महाड पोलादपूर तालुक्यांचा शैक्षणिक अनुशेष भरुन काढण्याचा संस्थेचा मानस आहे. सन २००७-२००८ पासून पोलादपूर येथे विज्ञान विद्याशाखा सुरु करण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला व शासन मान्यतेनुसार २००७-२००८ या वर्षापासून विज्ञान शाखा सुरु करण्यात आली.